पाथर्डी फाटा येथे दोन खासगी सावकारांच्या घरावर छापा संशयास्पद कागदपत्रे हस्तगत
पाथर्डी फाटा येथे दोन खासगी सावकारांच्या घरावर छापा संशयास्पद कागदपत्रे हस्तगत
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- विनापरवाना बेकायदेशीर सावकारी करीत अव्वाच्या सव्वा व्याज आकारणार्‍या खासगी सावकारी करणार्‍या दोघा भावांच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी धनादेशासह महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे.

याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे मुख्य लिपिक मंगेश मधुकर वैष्णव (रा. मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक या कार्यालयात तक्रारदार चंद्रकांत नारायण पवार (रा. प्रगतीनगर, जेलरोड) यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रारी अर्जामध्ये आरोपी अनिल दामू जगताप व लक्ष्मण दामू जगताप (दोघेही रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हे दोघे जण अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे तक्रारी अर्जात नमूद करून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी तक्रारदार पवार यांनी केली होती. त्यानुसार उपनिबंधक सहकारी संस्था या कार्यालयाच्या पथकाने खासगी सावकार अनिल जगताप व लक्ष्मण जगताप यांच्या घरावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत जगताप यांच्या घरात अवैध सावकारी व्यवहारासंदर्भात आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली.

तक्रारदार चंद्रकांत पवार यांनी तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे पवार यांनी अनिल जगताप व लक्ष्मण जगताप यांना शंभर रुपयांच्या कोर्‍या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी असलेला; परंतु दिनांक नसलेला भारतीय स्टेट बँक शाखा नाशिकरोड शाखेचा 3 लाख 1 हजार 800 रुपयांचा धनादेश छायांकित प्रत या रूपात दिला होता. पथकाने छापा टाकला असता जगताप हे प्रथमदर्शनी सावकारी करीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर ही सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, उपरोक्त कार्यवाहीसाठी खासगी सावकार अनिल जगताप व लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयातील संदर्भाधीन पत्रांन्वये इंदिरानगर पोलीस ठाण्यात खासगी सावकाराविरुद्ध संगनमत करून विनापरवाना बेकायदेशीररीत्या सावकारी करीत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group