१३ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यास तुम्हाला 50 रुपये मिळतील, असे सांगून अज्ञात भामट्याने एका तरुणाची सुमारे पावणेदोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी वैभव निवृत्तीनाथ दराडे (वय 28, रा. स्वाती अपार्टमेंट, नाशिक, मूळ रा. चापडगाव, ता. निफाड) हा तरुण नाशिक येथे शिक्षणासाठी आला आहे. दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी घरी होता. त्यावेळी 9372717696 या क्रमांकावरील टेलिग्राम अॅपवर अज्ञात व्यक्तीने दराडे याला लिंक पाठविली. त्यानंतर टेलिग्राम ग्रुपला जॉईंट करून टेलिग्राम ग्रुपवर यूट्यूबची लिंक पाठविली.
त्यानंतर अज्ञात इसमाने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याने तुम्हाला 50 रुपये मिळतील, असे सांगून फिर्यादी दराडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास सांगितले. आपला फायदा होणार आहे, या अपेक्षेने फिर्यादी यांनी आरोपीने सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी आरोपीच्या बँक खात्यांमध्ये 1 लाख 83 हजार रुपयांची रक्कम जमा केली; मात्र गुंतविलेल्या रकमेपोटी कुठलाही लाभ होत नसल्याने आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर दराडे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नरुटे करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar