ईडीद्वारे अटकेची भीती दाखवून वृद्धाला 90 लाखांचा गंडा
ईडीद्वारे अटकेची भीती दाखवून वृद्धाला 90 लाखांचा गंडा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मनी लॉण्डरिंगमध्ये सहभाग असल्यामुळे अटक करण्याची भीती दाखवून सायबर भामट्यांनी एका 70 वर्षांच्या वृद्धाला 90 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रमोद गजानन कुलकर्णी (वय 70, रा. लिली अपार्टमेंट, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड) यांना मोबाईल फोनद्वारे, तसेच सोशल मीडियावरून अज्ञात इसमांनी संपर्क साधला. सुप्रीम कोर्टाच्या, आरबीआयच्या ईडीचे, सेबीची बनावट कागदपत्रे बनवून अज्ञात इसमांनी फिर्यादी कुलकर्णी यांच्याशी वारंवार संपर्क साधला, तसेच अज्ञात इसमाने कुलकर्णी यांना मनी लॉण्डरिंगमध्ये सहभाग असल्याची भीती दाखविली. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांत तक्रार असल्याचीही भीती दाखविली. एकूणच कुलकर्णी यांना या गुन्ह्यात अटक टाळायची असेल, तर त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले.

त्यानुसार आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांत फिर्यादी कुलकर्णी यांनी मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे एकूण 89 लाख 60 हजार रुपयांची रक्कम पाठविली. संबंधित आरोपीने ही रक्कम खात्यात आल्यानंतर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधणे बंद केले. यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group