लासलगाव (वार्ताहर). :- नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे निफाड येथील शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान शेतकऱ्यांनी केली. लासलगाव येथे दिव्यांगांना रेशन कार्ड व प्रमाणपत्र वाटपानंतर बच्चू कडू यांनी नाफेडच्या गोडाऊन वर जात पाहणी करत संताप व्यक्त केला. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कांदा खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करत लक्ष घालण्याची मागणी करत लक्ष द्या अन्यथा तुमच्या गाडीवर कांदा फेकत थोबाड लाल करण्याचे आंदोलन करू असा इशारा माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिला.
कांद्याचे बाजार भाव वाढल्यानंतर कांदा बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागामार्फत दर वर्षाप्रमाणे याही वर्षी पाच लाख मॅट्रिक टन उन्हाळ कांदा नाफेड एनसीसीएफ मार्फत खरेदी केला हा कांदा प्रोड्युसर कंपन्यांमार्फत खरेदी करत त्यांच्याच गोडाऊन वर ठेवण्यात आल्या. एका दिवसातच इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी झाली. ज्या शेतकऱ्यांजवळ कांदा आणि त्यांच्या नावावर ही बोगस खरेदी दाखवण्यात आली याची खुद्द कबुली नाफेड चे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी दिली. त्यानंतर थेट पंतप्रधानांकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर आत्तापर्यंत चार समिती चौकशीसाठी येऊन गेल्या मात्र त्यातून काही साध्य झाले नाही व कुठली चौकशी झाली नाही.
याबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती शेतकरी बचत गट अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर, प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, सागर निकाळे यांनी दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडे केली. या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू हे लासलगाव येथील नाफेडच्या गोडाऊनवर पोहोचले असता या ठिकाणी एकही कांदा नसल्याने व गोडाऊन ओसाड पडल्याचे पाहून चांगलाच संताप व्यक्त केला. याबाबत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी फोनवर संपर्क साधत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. अब्दुल सत्तार यांनी 25 सप्टेंबर रोजी याप्रकरणी पणन विभागाच्या दालनात बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.
वारंवार तक्रारी करूनही आमच्या तक्रारींची दखल शासन स्तरावर घेत नसल्याने दिव्यांग विभागाचे अध्यक्ष व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे आज तक्रार केली असता त्यांनी तातडीने तक्रारीची दखल घेत लासलगाव येथील नाफेड गोडाऊन वर येत पाहणी केली. मंत्री पियुष गोयल यांच्याबाबत केलेला संताप एकदम योग्य असून आता तरी पियुष गोयल यांनी लक्ष दिले पाहिजे, असे मत निवृत्ती न्याहारकर, अध्यक्ष शेतकरी बचत गट यांनी व्यक्त केले.
नाफेड एनसीसीएफ कडून खरेदी केलेल्या कांद्या संदर्भात पिंपळगाव येथील नाफेडच्या गोडाऊन वर जात भ्रष्टाचाराबाबत आंदोलने केली मात्र कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने बच्चू कडू यांनी मंत्री पियुष गोयल यांच्या गाडीवर कांदा फेकून थोबाड लाल करण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे याची आम्ही समर्थन करतो तातडीने बच्चू कडू यांच्या इशाऱ्याची दखल न घेतल्यास त्यांच्या आंदोलनात आम्हीही सहभागी होऊ, असे गणेश निंबाळकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष यांनी सांगितले.