१५१८ विद्यार्थिनींकडून तब्बल १० हजारवर कोरफड रोपांची केली लागवड : इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स नोंद
१५१८ विद्यार्थिनींकडून तब्बल १० हजारवर कोरफड रोपांची केली लागवड : इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स नोंद
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : कात्रज येथील सरहद महाविद्यालयामधील १५१८ विद्यार्थिनींनी एकाच दिवशी तब्बल १० हजार ७५० कोरफड रोपांची लागवड करून विक्रम केला आहे. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये  नोंद झाली आहे.

सरहद महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त १५१८ विद्यार्थिनींनी १० हजार ७५० पेक्षा जास्त कोरफड रोपांची  लागवड केली. यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सचिव सुषमा नहार, सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, माजी प्राचार्य डॉ. हनुमंतराव जाधवर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.संगीता शिंदे, परीक्षक चित्रा जैन, सरहद संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख, सरहद महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्रमुख, उपक्रम समन्वयक वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. वर्षा निंबाळकर, सर्व प्राध्यापक, विद्यार्थिनी, स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.
 
शैलेश वाडेकर म्हणाले, शाश्वत विकास साधायचा असेल तर पर्यावरण पूरक जीवन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि केवळ बोलण्यापेक्षा आणि शिकण्यापेक्षा त्यांच्या हातून कृती घडावी या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अनुज नहार म्हणाले, कारगिल मधील सुरू व्हॅली येथे निसर्गोपचारावर आधारित उपक्रम सरहद संस्थेच्या वतीने सुरू आहेत. त्या उपक्रमांना सहाय्य करण्याच्या दृष्टीने आणि कोरफड वनस्पतीचे फायदे समजावेत, निसर्गोपचारांबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी कोरफड लागवडीचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे.

डॉ. संगीता शिंदे म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. पर्यावरण पूरक अशा कुंडीमध्ये कोरफडीचे रोप लावण्यात आले असून  विद्यार्थिनी हे रोप घेऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरात, घरी सोसायटीमध्ये  लावणार आहेत. डॉ. स्वाती माने व कोमल शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  श्रीराज भोर यांनी आभार मानले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group