नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- शिंदेगाव येथे आज दुपारी फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीत गोडावून भस्मसात झाले आहे. यात एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल केले तर काही कामगार गोडावून मध्ये अडकल्याची भीती आहे.
चंद्रकांत शिवलाल विसपुते व गौरव चंद्रकांत विसपुते (रा. देवळाली गाव) यांचे शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाचे गोडाऊन आहे. येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके विसपुते यांनी भरून ठेवले होते.
आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात कारणावरून आग गोडावूनला लागली. आग लागताच फटाक्यांना त्याची झळ लागली आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे मोठ मोठे लोळ दूरवरून दिसू लागले.
घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते, अग्निशमक दल तत्काळ पोहोचले.
नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पथक घटनास्थळी रवाना झाले.
या आगीत एक जण गंभीर भाजला असून दोन ते तीन जण गोडावून मध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.