३ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बी. ए. एम. एस. अभ्यासक्रमासाठी नेरूळ व वरळी येथील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मुलाला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून १६ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संजयकुमार धोंडीराम पगारे (रा. सिद्धार्थ कॉलनी, स्वामी विवेकानंदनगर, मखमलाबाद) हे दि. २२ जानेवारी २०२२ रोजी घरी होते. त्यावेळी आरोपी अशोक गणपती कांबळे (रा. अहिंसा टेरेस, मालाड पश्चिम, मुंबई) याने पगारे यांच्या मोबाईलवर मेसेज करून तुमचा मुलगा अथर्व याला बी. ए. एम. एस. शैक्षणिक कोर्सकरिता कर्नाटकच्या कृष्णा आयुर्वेद मेडिकल कॉलेज किंवा डी. वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेज, नेरुळ अथवा पोतदार आयुर्वेदिक कॉलेज, वरळी या कॉलेजमध्ये प्रवेश करून देतो, असे सांगितले.
त्यावर फिर्यादी पगारे यांचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपी कांबळे याने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख २२ हजार ५०० रुपये बँकेद्वारे घेतले; मात्र फिर्यादी यांचा मुलगा अथर्व याचे अॅडमिशन करून दिले नाही व अॅडमिशनकरिता घेतलेली रक्कमही परत न करता घेतलेली फसवणूक दि. २० जानेवारी २०२२ ते दि. २ सप्टेंबर २०२४ दरम्यानच्या काळात घडला.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अशोक कांबळे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar