आपण आतापर्यंत दोन डोकं, चार हात, तर कधी तीन पाय असलेली अनोखी बाळं जन्माला आल्याचं ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल. चीनमधील ही अनोखी घटना घडली आहे. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला जन्मापासूनच शेपटी असल्याचे पाहून डॉक्टरांसह सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोणाचाही विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. डॉक्टरांच्या टीमनं शस्त्रक्रियेद्वारे ही शेपटी काढून टाकली आहे.
चीनच्या हांगझोऊ चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये चार इंच लांब शेपटी असलेल्या एका बाळाचा जन्म झाला. या हॉस्पिटलमधील बालरोग ऑन्कोलॉजीचे उपाध्यक्ष डॉ. ली यांच्या म्हणण्यानुसार, ही अतिशय दुर्मीळ अशी घटना आहे. डॉ. ली यांनी सोशल मीडियावर शेपटीसह जन्माला आलेल्या बाळाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात बाळाच्या मणक्याखालून शेपूट बाहेर आल्याचं दिसतंय. हे पाहून पालकांही अवाक झाले.
डॉ. ली यांनी म्हटलंय की, मुलाच्या पाठीच्या कण्याला ही शेपटी जोडलेली असावी, असा आमचा संशय होता आणि एमआरआयमध्ये त्याची पुष्टी झाली. अशा प्रकारे शेपटी असलेलं बाळ जन्माला येणं हा असामान्य वाढीचा परिणाम आहे. ज्यावेळी अवयवांची वाढ खूप वेगानं होत असते तेव्हा ती प्रक्रिया थांबविता येत नाही; ज्यामुळे अशी परिस्थिती उदभवते.
जेव्हा पाठीचा कणा आसपासच्या उतकांशी असामान्यपणे जोडलेला असतो, त्यावेळी अशा प्रकारे शेपटी बाहेर येते. सहसा असं होत नाही; पण काही वेळा न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये असं होऊ शकतं.