दाम तिप्पट करण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा देणारा जेरबंद
दाम तिप्पट करण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा देणारा जेरबंद
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दामदुप्पट नव्हे, तर दामतिप्पट नोटा करून देतो, असे सांगून एका महिलेचे सात लाख रुपये घेऊन फरारी झालेल्या आरोपीस तब्बल दोन वर्षांनी अटक करण्यास गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाला यश आले आहे. तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (वय 25, रा. समर्थ हार्डवेअर दुकानासमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण, जि. नाशिक) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, की सुमारे दोन वर्षांपूर्वी गेल्या वर्षी 11 मार्च 2022 रोजी ओळखीच्या महिलेला तिची रक्कम तिप्पट करून देतो, असे आमिष दाखवून तेजस वाघ याने एका महिलेला संगनमत करून फिर्यादी महिलेला हॉटेल चटक मटकसमोर, गंगाघाट येथे रात्री साडेनऊ वाजेच्या आसपास बोलावले होते. सात लाख रुपयांचे 23 लाख रुपये करून देतो, असे आमिष आरोपीने दाखविले होते. आमिषानुसार ही महिला घटनास्थळी आली असता तिच्याकडून सात लाख रुपये घेऊन त्याऐवजी बनावट नोटांची बंडले देऊन तेजस वाघ हा त्याच्याबरोबर असलेल्या महिला सहकाऱ्यासह फरारी झाला.

या प्रकरणी दि. 12 मार्च 2022 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपी सतत जागा बदलून लपून राहत होता.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि गुन्हे शाखेचे शहर उपायुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तेजस वाघचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू असताना तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (वय 25, रा. समर्थ हार्डवेअर दुकानासमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) येथे असल्याबाबतचे वृत्त समजताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार महेश साळुंके, अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप व आप्पा पानवळ यांचे पथक तयार करून रवाना केले.

या पथकाने तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (वय 25) यास सापळा रचून त्यास पकडत असताना त्यास पोलीसांची चाहुल लागल्याने तो पळून जाऊ लागला; मात्र पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. तेजसच्या पुढील चौकशीत त्याच्याकडून फसवणूक करण्यासाठी वापरात येणाऱ्या 500, 200, 100 व 50 रुपये दराच्या बनावट 157 नोटांचे बंडल हस्तगत करण्यात आले आहे. त्यास पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ अधिकारी, तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. हेमंत तोडकर, उपनिरीक्षक गजानन इंगळे, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश माळोदे, हवालदार देवीदास ठाकरे, नाईक मिलिंदसिंग परदेशी, हवालदार महेश साळुंखे, शरद सोनवणे, देवीदास ठाकरे, धनंजय शिंदे, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, नाईक मिलिंदसिंग परदेशी, अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ, मुख्तार शेख, राम बर्डे, चालक उपनिरीक्षक किरण शिरसाठ यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group