नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक लोकसभा निवडणुकीत पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने ठाकरे गटाचे विजय करंजकर यांना आश्वासन देऊनही तिकीट न दिल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर त्यांची शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. करंजकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विजय करंजकर यांनी बंडाचे निशान फडकवले आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. शक्ती प्रदर्शन करत नुकताच देवळालीमध्ये समर्थक मेळावा घेतला. त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी ठाकरे गटाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, करंजकर हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांची उमेदवारी हेमंत गोडसे यांना सुध्दा अडचणीची ठरणार होती. त्यामुळे शिंदे गटाने जोरदार फिल्डींग लावून त्यांना आपल्या पक्षात घेतले. आज उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस असल्याने विजय करंजकर आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतील. त्यांच्या माघारीने महायुतीची शक्ती वाढणार आहे.
त्यांच्या पक्ष प्रवेशाप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, राजू लवटे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह विजय करंजकर यांचे समर्थक उपस्थित होते.
शिवसेनेत प्रवेश करताना विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला केला. ते म्हणाले, नाशिकमधून मी लोकसभेला इच्छुक होतो. परंतु मला आश्वासन दिल्यानंतरही टाळले गेले. ज्याचे नाव चर्चेत नाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. आता गद्दार कोण आहे, हे येत्या काळात मी दाखवून देईल.