नाशिकरोड (प्रतिनिधी) : पोलीस आयुक्तालयातील व नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीतील पोलीस ठाण्यात घरफोड्या व अपहरण करणारा, विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या फरार संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने रेल्वेस्थानक परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.
करण भरत वाघेला (वय 28, मूळ रा. रावेर रेल्वेस्टेशन जवळ, जि. जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, प्रकाश बोडके, संदीप रामराजे, गुलाब सोनार, नितीन फुलमाळी यांचे पथक नाशिकरोड परिसरात गुन्हेगारांचा शोध घेत होते.
त्यावेळी पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना गुप्त बातमीदाराद्वारे समजले की, फरार असलेला करण वाघेला हा नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात येणार आहे. तेथे त्यांनी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
त्याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने नात्याने भाऊ असलेल्या अजय वाघेला सोबत उपनगर, घोटी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, वाहनचोरी तर इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत अपहरणाचा गुन्हा केल्याचे कबूल केले.