दिल्लीहून वाराणसीला मंगळवारी जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट मध्ये पहाटे ५.३५ वाजता बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. सध्या क्यूआर टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानाची तपासणी केली जात आहे, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाने दिली.
दरम्यान, उड्डाण करण्यापूर्वी इंडिगोच्या क्रूला विमानाच्या शौचालयात "बॉम्ब" शब्द लिहिलेली एक चिठ्ठी सापडली, असे घटनास्थळी असलेल्या विमान सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.
तर, 'सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाइट 6E2211 च्या लॅव्हेटरीमध्ये 'बॉम्ब' असा शब्द लिहिलेला टिश्यू पेपर सापडला होता, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तपासणी करण्यास सांगितले होते'.
बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर इंडिगोच्या क्रूने सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत अलर्ट जारी केला आणि प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली. काही प्रवाशांनी आपत्कालीन गेटवरून तर काहींनी फ्लाइटच्या खिडकीतून खाली उड्या मारायला सुरुवात केली. विमानाची सध्या तपासणी सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान टर्मिनल परिसरात परत ठेवले जाईल, असे इंडिगो ने सांगितले.