नाशिक परिमंडळामध्ये  सुरक्षा ठेवीच्या व्याजाचे समायोजन ; २४ लाख ८२ हजार वीजग्राहकांना ३१ कोटी १४ लाख रुपये परतावा
नाशिक परिमंडळामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजाचे समायोजन ; २४ लाख ८२ हजार वीजग्राहकांना ३१ कोटी १४ लाख रुपये परतावा
img
दैनिक भ्रमर
नाशिक : वीज कायदा २००३ नुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीच्या रकमेवरील व्याजापोटी सन २०२३-२४ मध्ये नाशिक परिमंडळा अंतर्गत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील २४ लाख ८२ हजार १३९ ग्राहकांना व्याजाच्या रूपाने ३१ कोटी १४ लाख ६७ हजार रुपयांचा परतावा त्यांच्या मागील दोन महिन्यातील वीज बिलातून समायोजित करण्यात आला आहे.

मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. मा. आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे.

तसेच विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन २०२३-२४ मध्ये नाशिक परिमंडळा अंतर्गत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील २४ लाख ८२ हजार १३९ ग्राहकांना ३१ कोटी १४ लाख ६७ हजार रुपयांच्या व्याजाचा परतावा मागील दोन महिन्यांच्या वीजबिलांच्या माध्यमातून समायोजित करण्यात आला आहे. 

जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी नाशिक मंडळा अंतर्गत चांदवड विभागातील १ लाख ६७ हजार ३५५ ग्राहकांना १ कोटी ४९ लाख २९ हजार, नाशिक ग्रामीण विभागातील २ लाख ५२ हजार ५८० ग्राहकांना ३ कोटी १८ लाख ६८ हजार, नाशिक शहर १ विभागातील २ लाख २३ हजार २६८ ग्राहकांना ४ कोटी ७३ लाख ११ हजार, नाशिक शहर २ विभागातील ४ लाख ७२ हजार ४५१ ग्राहकांना ५ कोटी ५१ लाख ५८ हजार रुपयांचा परतावा समायोजित करण्यात आला आहे.  

तसेच मालेगाव मंडळाअंतर्गत कळवण विभागातील ८९ हजार ९०१ ग्राहकांना ८७ लाख ६१ हजार, मालेगाव विभागातील ८१ हजार ७७५ ग्राहकांना ७६ लाख ५ हजार, मनमाड विभागातील १ लाख २९ हजार ७६ ग्राहकांना १ कोटी २१ लाख ४ हजार, सटाणा विभागातील ७७ हजार ७०७ ग्राहकांना ७० लाख ९१ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. अशी एकूण नाशिक जिल्ह्यात १४ लाख ९४ हजार ११३ ग्राहकांना १८ कोटी ४८ लाख २७ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

या सोबतच अहमदनगर मंडळात ९ लाख ८८ हजार २६ ग्राहकांना १२ कोटी ६६ लाख ४० हजार रुपयांचा परतावा समायोजित करण्यात आला आहे. नाशिक परिमंडळाअंतर्गत संबंधित वीजग्राहकांना यापूर्वी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे तरी सदर सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group