नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अंबड एम. आय. डी. सी. तील इंडियन बँकेत दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की अंबड एम. आय. डी. सी. मध्ये इंडियन बँकेची शाखा आहे. आज पहाटे या बँकेचा स्लॅब कटरच्या सहाय्याने फोडून बँकेत दरोड्याचा प्रयत्न झाला. बँकेतून काही ऐवज चोरीस गेला की नाही, हे समजू शकले नाही. गेल्या वर्षी या बँकेत अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न झाला होता. पुन्हा ही घटना घडल्याने या बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच चुंचाळे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे हे घटनास्थळी पथकासह दाखल झाले. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी तीन पथके रवाना केल्याचे समजते. बँकेचे अधिकारी सकाळी कामावर गेल्यानंतर ही घटना लक्षात आली.
या बँकेत रात्रीच्या वेळी गस्तीसाठी कोणताही सुरक्षारक्षक नसल्याचे समोर आले असून, सीसीटीव्ही कॅमेरेही अपुरे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.