पहिला हप्ता म्हणून 50 हजारांची लाच घेताना हवालदार अटकेत
पहिला हप्ता म्हणून 50 हजारांची लाच घेताना हवालदार अटकेत
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अवैध वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तक्रारदाराकडून 2 लाख 60 हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार किरण रवींद्र पाटील (वय 41) यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केली.

याबाबत माहिती अशी, की यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापूर्वी भडगाव पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात दोन गुन्हे दाखल आहेत. तरीही तक्रारदारांना वाळूचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवायचा होता. त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी हवालदार किरण पाटील यांनी तक्रारदारांकडे 2 लाख 60 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष 50 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंचा भाजपाला दणका! विदर्भातील 'हा' बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

जळगाव विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांनी हा सापळा यशस्वी केला. याबद्दल नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group