मुंबई : मुंबईच्या अॅन्टॉप हिल परिसरात ह्रदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पित्यानं चक्क आपल्या दोन वर्षांच्या मुलाची दीड लाखांना विक्री केली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पित्याकडून स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलाची विक्री केल्याचं उघड झालं आहे. आरोपी पित्यासह चौंघांविरूद्ध मानवी तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना मुंबईच्या ॲन्टॉप हिल परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी पित्यासह चौघांविरोधात मानवी तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. मुलाच्या आजोबांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
नेमकं काय घडलं?
वडाळा पूर्व येथील ॲन्टॉप हिल परिसरातील विजय नगर येथे अमर धीरेन सरदार यांची मुलगी काजल राहत होती. काजल यांनी आरोपी अनिल पूर्वया याच्यासोबत दुसरा विवाह केल्यानंतर काजल यांना अनिलपासून दोन वर्षांचा शिवम नावाचा मुलगा झाला. पण काही दिवसांपूर्वी काजल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा नातू वडील अनिल पूर्वया यांच्यासोबत राहत होता. पण गेल्या काही दिवसांपासून आजोबा आणि नातवाची भेट होत नव्हती. त्यामुळे आजोबांना संशय आला.
गेल्या काही दिवसांपासून आजोबा अमर धीरेन यांना नातू शिवम हा भेटला नव्हता. जून महिन्यांपासून ते अनिलला नातू शिवमबाबत विचारत होते. पण तो काही तरी कारण सांगून वेळ मारून न्ह्यायचा. अखेर त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता जवळच राहणाऱ्या आस्मा शेख यांच्यामार्फत मुलाला विकल्याचं निष्पन्न झालं.
अनिलनं जुलै महिन्यात घरात कोणालाही न सांगता मुलाला शेखकडे नेलं. त्यानं आशा पवार, शरीफ शेख आणि इतर आरोपींच्या मदतीनं मुलाची दीड लाखांना विक्री केली.
मुलाचे आजोबा अमर धीरेन यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, वडाळा ट्रक टर्मिनस (टीटी) पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सीमा खंडागळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 143 (1) (3) (4), 3 (5) सह बाल न्याय कायदा कलम 81 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.