नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच एका तरुणीला भूतबाधा झाली असून, तिच्यासाठी 21 दिवस धार्मिक पूजा करावी लागेल, असे एका भोंदूबाबाने सांगितले. तसेच तरुणीमुळे अन्य महिलांनाही भूतबाधा झाल्याचे बतावणी करून एक महिला, मुलगी, मामी आणि 60 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर आरोपी भोंदूबाबाला 20 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (वय 50, रा. अंबेनगर, भांडेवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पारडी पोलिसांनी 9 जानेवारी 2021 रोजी 17 वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दुलेवाले बाबाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.
आरोपी भोंदूबाबा हा तंत्र-मंत्राने उपचार करण्याच्या बहाण्याने कुटुंबातील तरुणीचे लैंगिक शोषण करत होता. अशाच प्रकारे त्याने कुटुंबातील इतर तीन महिलांवरही लैंगिक अत्याचार केला. त्याने जवळपास अडीच वर्षांपर्यंत त्या कुटुंबातील महिलांचे शोषण केले. अखेर त्याचे बिंग फुटले आणि पोलिसात तक्रार करण्यात आली.
पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी. जयस्वाल यांनी नराधम भोंदूबाबाला दोषी ठरवून 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
60 वर्षीय आजीलाही सोडले नाही
दुलेवाले बाबाने कुटुंबातील सर्वच महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याची हिंमत एवढी वाढली की, त्याने तरुणीच्या 60 वर्षीय आजीलाही सोडले नाही. आजीवरही पूजा करण्याच्या नावावर अत्याचार केला. चौघींनाही त्याने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य केल्यानंतर तरुणीने आईला ही बाब सांगितली. त्यानंतर मामी आणि आजीलाही विचारणा केली. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय केला. चौघांवरही त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.