नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला गर्भवती करून त्यानंतर नवजात बालकाचा स्वीकार करण्यास नकार देणार्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित महिला व आरोपी तरुण यांच्यात मार्च 2022 ते दि. 19 फेब्रुवारी 2024 या काळात मैत्रीचे संबंध होते. यावेळी आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले.
त्यानंतर पीडिता प्रसूत झाल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला; मात्र आरोपी तरुणाने पीडितेशी लग्न न करता नवजात बालकाचा स्वीकार करण्यास नकार देऊन फसवणूक केली.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी तरुणास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक न्हाळदे करीत आहेत.