Nashik Crime : पत्नीनेच दहा तोळ्यांच्या दागिन्यांसह केली पतीची 31 लाखांची फसवणूक
Nashik Crime : पत्नीनेच दहा तोळ्यांच्या दागिन्यांसह केली पतीची 31 लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पतीला विश्वासात घेऊन त्याच्याशी लगट करून वेगवेगळी खोटी कारणे सांगून पत्नीने इतर नातेवाईकांच्या मदतीने वेळोवेळी रोख रक्कम घेऊन, तसेच माहेरी जाताना घरातील 11 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेत सुमारे पतीची 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रोहित लक्ष्मण ग्रोवर (वय 32, रा. रामेश्वरनगर, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक) असे फसवणूक झालेल्या पतीचे नाव आहे. ग्रोवर यांची पत्नी निधी ग्रोवर हिने तिचे दाजी जतीन वर्मा, हितेश बत्रा व कोमल वर्मा यांना पैसे लागत असल्याचे कारण देऊन त्यांना मदत करण्यासाठी पतीकडून 1 लाख 17 हजार 921 रुपये घेतले. त्यानंतर आरोपी निधीचे वडील आरोपी अशोक बत्रा यांनी फिर्यादी रोहित ग्रोवर यांच्या वडिलांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले, तसेच पत्नी निधीचे दाजी उज्ज्वल लोहिया यांनीही पैशांची मदत करण्याच्या बहाण्याने पाच लाख रुपये घेतले. 

अशा प्रकारे सहा आरोपींनी फिर्यादी रोहित ग्रोवर व त्यांच्या वडिलांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली; मात्र ती अद्याप परत केली नाही, तसेच फिर्यादीची पत्नी निधी हिने माहेरी जाण्यासाठी खोटे कारण सांगून जाण्याचा बहाणा केला. त्यासाठी माहेरी जाण्यापूर्वी बेडरूमच्या कपाटात असलेली 2 लाख 71 हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 22 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, डायमंडचे पेंडंट, 10 ग्रॅम सोन्याचे कॉईन, 40 ग्रॅम सोन्याचा नेकलेस, कानातले जोड, अंगठी, 11 ग्रॅम वजनाचे मणिमंगळसूत्र, 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस असा 20 लाख रुपयांचा ऐवज फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेला. एकूण 31 लाख 88 हजार 921 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 24 एप्रिल ते 28 डिसेंबर 2023 यादरम्यान फिर्यादीच्या घरी घडला. 

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पत्नी व सासऱ्यासह इतर सहा नातेवाईकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group