नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : अडीच कोटींची फसवणूक, मनी लॉण्डरिंग व अवैध गुंतवणुकीच्या प्रकरणात वॉरंट्स जारी करून अटकेची भीती दाखवून एका इसमास सायबर भामट्याने ऑनलाईन पद्धतीने 4 कोटी 25 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांना 8123156609, 8886182930, 9585243142 व 9741070600 अशा विविध क्रमांकांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकधारक अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधला. आरोपींनी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या नावाचा लोगो वापरून व्हॉट्सअॅप प्रोफाईलचा डीपी ठेवला होता. संशयितांनी फिर्यादीच्या नावे असलेल्या कॅनरा बँकेच्या क्रेडीट कार्डाचा वापर करून 2.56 कोटी रुपयांच्या फसवणुकीमध्ये, तसेच सुरेश अनुरागच्या मनी लॉण्डरिंग व गुंतवणूक फसवणुकीच्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून नाव असल्याचे त्यांना सांगून त्यांच्या नावे दोन वॉरंट्स जारी झाले, असे सांगून त्यांना अटकेची भीती घातली.
त्याचप्रमाणे फिर्यादीच्या घरी डिजिटल व्हिडिओ, ऑडिओ कॉलद्वारे नजरकैद केल्याचे भासविले. त्यानंतर अज्ञात इसमांनी फिर्यादीचे फिक्स डिपॉझिट व म्युच्युअल फंड यांची सर्व माहिती घेतली. या गुंतवणुकीमध्ये मनी लॉण्डरिंग व गुंतवणुकीच्या फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआय अधिकारी ईडीच्या मार्फत पुढील चौकशीसाठी गुंतवणूक केलेली सर्व मालमत्ता रोखून ठेवली, तसेच फिर्यादीचे बचत खाते जमा करून वेळोवेळी सुप्रीम कोर्ट व ईडीच्या बनावट नोटीसा पाठविल्या, तसेच आरोपींनी पाठविलेल्या खोट्या नोटिसांमधील दिलेल्या बँक खात्यांवर, तसेच वॉलेट खात्यावर फिर्यादी यांना एकूण 4 कोटी 25 लाख 50 हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार दि. 19 जून ते 6 जुलैदरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.