नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- शहरासह राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस विभाग टीकेचे लक्ष होत असतानाच नाशिकरोडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने केवळ हॉटेल मध्ये रोटीसाठी वेटरवर सर्व्हिस रिव्हॉल्वर रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अंगरक्षक म्हणून काम करणाऱ्या या पोलिसाविरुद्ध नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याकडील शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली की, विशाल झगडे असे त्या वादग्रस्त पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेरील हॉटेल रामकृष्ण येथे शुक्रवारी रात्री १२.३० वाजता घडलेल्या या घटनेने भितीचे वातावरण झाले होते.
घटनेच्या वेळी संबंधित पोलीस नशेत असल्याची चर्चा होती.
फिर्यादीत म्हटले आहे की सागर निंबा पाटील (वय २७, रा. आगरटाकळी) हे हॉटेल रामकृष्णमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पहातात.
शुक्रवारी रात्री बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची ये-जा सुरू असताना तिघेजण जेवणासाठी आले. ते टेबलवर बसल्यानंतर सिरॉन शेख हा वेटर अॉर्डर घेण्यासाठी गेला. मात्र त्याने रोटी नसल्याचे सांगितल्यानंतर तिघेही वाद घालू लागले. त्यापैकी सफारी परिधान केलेल्या व हातावर पोलीस असे गोंदवलेल्या एकाने कमरेचे रिव्हॉल्वर काढून सिरॉनवर रोखले.
'तू काहीही कर, आम्हाला रोटी पाहिजे' असे धमकावत शिवीगाळ केली. सागर पाटील यांनी समजवल्यानंतर तिघेही जेवण न करताच निघून गेले. पाटील यांनी हॉटेल मालक विनोद भगत यांना याबाबतची माहिती दिली असता १५-२० दिवसांपूर्वी अशाच प्रकारे वाद घातल्याचे समोर आले.
त्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे करीत आहेत.