इगतपुरी - रेल्वे प्रवासात साडेचार लाखांचे दागिने चोरणाऱ्या २ जणांना इगतपुरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
अरूणा रत्नाकर चित्तेवान या आपल्या कुटुंबासह अप अमरावती एक्सप्रेसने भुसावळ ते ठाणे प्रवास करत होत्या.
इगतपुरीतुन गाडी सुटल्यानंतर कसारा घाट येथे गाडी थांबुन सुरू झाल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स चोरून त्यातील ४ लाख ४७ हजार ६३४ रूपये किमतीचे सोन्या चांदीचे विविध दागिने हिसकावुन चोरून नेले. म्हणून अरूणा रत्नाकर चित्तेवान (वय ६०, रा. रूम नं १०५ ए विंग, नर्मदा गगन हौसींग सोसायटी रामदेव पार्क, मीरा रोड पुर्व, ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) प्रमाणे इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग मनमाड सूर्यकांत बांगर, इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास करण्यात आला.
तपासी अमलदार सहाय्यक फौजदार दिपक निकम, हेमंत घरटे, राजेश बागुल, गोविंद दाभाडे, योगेश पाटील, नितीन देशमुख या कर्मचाऱ्यांनी तपास करीत आरोपी निष्पन्न केले आहेत. संशयित आरोपी रवि नामदेव धोंगडे (वय २५, रा. देवुळवाडी कसारा, सध्या रा. आंबेडकर चौक वासींद), समीर जनार्दन घोडविंदे (वय १९, रा. सावरोली ता. शहापुर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दोघांकडून चोरी झालेले सोन्याचांदीचे बहुतांश दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दोघांकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता गृहीत धरून अधिक तपास करण्यात येत आहे.