नाशिक (चंद्रशेखर गोसावी):- जिल्हा रुग्णालयातून पळविण्यात आलेल्या बाळाचा तपास लागला असून हे बाळ सुखरूप आहे. ते बाळाच्या आईकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून काल सकाळी सुमन खान अब्दुल खान (मुळ रा. उत्तर प्रदेश) सध्या सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथे ते काम करीत आहेत. त्यांना डिलिव्हरी साठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या ठिकाणाहून त्यांना पाच दिवसांपूर्वी जन्माला आलेले बाळ पळून नेल्याची घटना घडली होती. यानंतर जिल्हा रुग्णालयाने पळून नेण्यात आलेले बाळाच्या आई आणि संबंधित महिला यांच्यामध्ये संबंध असल्याचे लेखी निवेदनाद्वारे कळविले होते. त्यानंतर याबाबतचा गुन्हा हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी शोध घेऊन पंचवटी परिसरामध्ये सपना मराठे या महिलेला संशयास्पद हालचाली करताना पकडले व तिच्याकडे चौकशी केली असता तिच्याकडे हे बाळ सापडले. सपना मराठे या महिलेला मूल होत नसल्याकारणाने तिने हे बाळ पळवल्याची कबुली पंचवटी पोलीस ठाण्यात दिली आहे.
यापूर्वी जिल्हा रुग्णालयात जाऊन पूर्णपणे रेकी केली होती आणि नंतरच सुनियोजित आखणी करून बाळाला पळविल्याचे तिने पंचवटी पोलिसांना सांगितले. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शोध घेतल्यानंतर त्यांना हे यश आले आहे.