नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- येथील रोकडोबावाडी कडून जयभवानी रोडला जाणार्या एका कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट म्हसोबा मंदिर मागील नाल्यात कोसळले. पंधरा ते वीस फूट खोल नाल्यात कार कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री 11 वाजेच्या सुमारास मथुरा रोड, श्री अण्णा गणपती रोकडोबा वाडी मार्गे सागर विलास दरगोडे (रा. रिलायन्स पेट्रोल पंप समोर, म्हसरूळ) हे आपल्या अर्टिगा कार (क्र. एम एच 15 जे एक्स 8607) घेऊन जय भवानी रोड मार्गे म्हसरूळ येथील आपल्या घरी जात होते.
रोकडोबावाडी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सोडल्यानंतर भाजपा पदाधिकारी नितीन खोले यांच्या म्हशीच्या गोठ्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून जात असताना वाहनधारकाचा गाडीवरचा ताबा सुटला व वाहनासह तो म्हसोबा मंदिर मागील वालदेवीला जाणार्या खोल नाल्यात गाडीसह कोसळला. गाडीचा वेग अधिक असल्याने मोठा आवाज झाला आणि गाडी नाल्यात पडली.
रस्त्याने जाणार्या बाबा थोरात, गणेश गवळी यांनी गाडी चालकास सुखरूप बाहेर काढले. तत्काळ नागरिकांनी अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र त्यांनी गाडी काढण्यास नकार दिला. खाजगी क्रेनच्या मदतीने रात्री उशिरा अर्टिगा गाडी बाहेर काढण्यात आली. अपघातात वाहनचालक जरी सुखरूप असला तरी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.