उत्तर प्रदेशमध्ये दोन मैत्रिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. फरूर्खाबाद जिल्ह्यातील भगौतीपूर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. फॉरेन्सिक टीमकडून देखील तपास सुरू आहे. पोलिसांनी या घटनेला आत्महत्या असल्याचे म्हटलं तर पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगौतीपूर गावामध्ये राहणाऱ्या रामवीर जाटव यांची मुलगी बबली आणि महेंद्र जाटव यांची मुलगी शशि या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी या दोघी एकत्र मंदिरामध्ये गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परत आल्याच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना त्या आत्याच्या घरी गेल्या असाव्यात असे वाटले.
मुली सकाळी घरी न आल्यामुळे दोघींचे देखील कुटुंबीय चिंतेत आले होते. पण सकाळी गावातील नागरिकांना या दोन्ही मुलींचा मृतदेह गावामध्ये असलेल्या आंब्याच्या बागेतील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे भगौतीपूर गावामध्ये एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती मुलींच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली. त्यानंतर संपूर्ण गावानेच घटनास्थळी मोठी गर्दी केली. मुलींना अशा अवस्थेत पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला.
पोलिस अधिक्षक अलोक प्रियदर्शी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. त्यांनी फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी बोलावून घेतलं. मुलींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिस मृत मुलींच्या कुटुंबीयांशी बोलले. पोलिस अधिक्षक डॉ. संजय कुमारने या मुलींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पण मुलींनी आत्महत्येचे पाऊल का उचलले या मागचे कारण समजू शकले नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं कारण समोर येईल. मुलींच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.