पोलीस असल्याची बतावणी करीत दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले. ही घटना 29 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास जांबे येथे घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश विश्वास सावंत (वय 34, रा. राऊतनगर, अकलूज, जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर विलास घाडगे (वय 26, रा. मगरवस्ती खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुभम यशवंत कुलकर्णी (वय 21, रा. लिगसी मिलिनिया सोसायटी, गायकवाडनगर, पुनावळे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचा मित्र अभ्युदय चौधरी हे दोघेजण दुचाकीवरून चालले होते. यावेळी दोन कारमधून आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. तसेच आरोपींनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवत दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
मात्र, पैसे न मिळाल्याने आरोपींनी 50 हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या, 1 लाख 25 हजार रुपये किमतीची 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 15 हजारांचे घड्याळ असा ऐवज मारहाण करून काढून घेतला. त्यांना मारहाण करून फलटण येथे रात्रभर डांबून ठेवले.
त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पंढरपूर महामार्गावर सोडून दिले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाला समांतर तपासाचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळाजवळील तसेच टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. आरोपी माळशिरस येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, एक टीम माळशिरस येथे रवाना करण्यात आली. फौजदार सुनील भदाणे व टीमने स्थानिक पोलिसांच्या मदतीने घाडगे व योगेश यांना अकलूज येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार व दोन मोबाईल असा 8 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी घाडगे पोलीस रेकॉर्डवरील असून, त्याच्यावर वेळापूर पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच इतर आरोपींवरही खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अॅट्रॉ सिटी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, फौजदार सुनील भदाणे, सुनील कानगुडे, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, किरण काटकर, आशिष बोटके, प्रदीप गायकवाड, हुलगे यांच्या पथकाने केली. महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.