एका आठ वर्षाच्या मुलाने किराणा दुकानातील चॉकलेट चोरल्याचा संशयातून दुकानातील महिलेने बालकाला झाडाला बांधून ठेवले. हा संतापजनक प्रकार केज तालुक्यातील एका गावात गुरुवारी घडला. या घटनेने खळबळ उडाली आहे. चॉकलेट चोरल्याचा संशयावरून तब्बल दीड तास लहान मुलाचे हातपाय बांधून त्याला उन्हात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमधल्या केज तालुक्यात येवता नावाच्या गावात घडला.
याविषयी अधिक माहिती अशी की ,दुपारच्या सुट्टीत आपला मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने मुलाची चौकशी करून त्याचा शोध घेतला आसता, त्याला झाडाला बांधल्याचे पाहिले. रडताना त्याने पाणी मागितले तरी त्याला पाणी न देता मारहाण केली. हे बालक घाबरल्यामुळे त्याच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींविपींरुद्ध अॅट्रॉ सिटीचा गुन्हा दाखल केला आहे. 29 ऑगस्ट रोजी चिमुरड्यासोबत हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद शाळेजवळ किराणा दुकान चालवणाऱ्या कविता जोगदंड यांनी "चॉकलेट का चोरतोस?" असं विचारत बळजबरीने या मुलाचे हातपाय बांधून ठेवल्याचा आरोप आहे. सध्या आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान , याप्रकरणी मुलाचे वडील संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (अॅट्रॉ सिटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवता गावात घडलेल्या प्रकरणाबद्दल बोलताना माजलगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बी. धीरज कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली "येवता गावात एका महिलेने लहान मुलाला बांधून ठेवल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले तिन्ही आरोपी सध्या फरार असून आम्ही एक ते दोन दिवसांमध्ये आरोपींना अटक करून पुढील चौकशी करणार आहोत. बीड जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी आम्ही सध्या प्रयत्न करत आहोत,"