विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडी कडून अजून जागावाटपचा कोणताच फॉर्म्युला ठरलेला नाही. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आजच्या बैठकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातुन माजी आमदार वसंत गिते यांनी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधाकर बडगुजर आणि वसंत गिते यांनी उमेदवारी करण्यासाठी एकमुखाने निर्णय झाल्याचे समजते.
सुधाकर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. नाशिकच्या शिवसैनिकांचा प्रस्ताव पक्ष श्रेष्ठींना पाठवला जाणार आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे पण या जागांवर दावा करत असल्याने वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.