सिंधुदुर्ग : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह दाखल झाले होते. पाहणी करुन नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह परत निघालेले असताना मविआचे पदाधिकारी देखील तिथे दाखल झाले होते.
यावेळी शिवसैनिक आणि राणे समर्थक आमने सामने आले होते. याठिकाणी थोडी बाचाबाची झाली. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नारायण राणे यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.
आम्ही आमच्या भागात आहोत, बाहेरचे येऊन इथं दादागिरी करत असतील, पोलीस त्यांना प्रोटेक्शन करणार असेल तर आम्ही येथून हलणार नाही, काही करायचे ते करा गोळ्या घाला हलणार नाही. असे आंडू पांडू आयुष्यभर पाहिले, आम्ही इथून जाणार नाही, असं नारायण म्हणाले. महाराजांचा पुतळा पडला इथं पाहायला येणं ही काय चांगली गोष्ट आहे का? असा प्रश्न यावेळी नारायण राणे यांनी केला.
नारायण राणे आणि निलेश राणे यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नारायण राणे समर्थकांनी यांनी यावेळी त्यांच्या घोषणाबाजी केली. त्याला उत्तर देत आमदार आमदार वैभव नाईक आणि शिवसैनिकांनी देखील घोषणाबाजी केली.
आदित्य ठाकरे, विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी यावेळी तिथं पोहोचले होते. त्यांच्यासोबत शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणावर होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मविआचे नेते दाखल झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय डायवर्ट करायचा आहे. 15 मिनिटात राणे समर्थक खाली गेले नाहीत तर आम्ही शिवसैनिकांची ताकद दाखवणार आहोत. शिवसैनिक म्हणून 15 मिनिटानंतर आदित्य ठाकरे यांचा आदेश देखील ऐकणार नाही. 15 मिनिटात ते खाली गेले नाहीत तर शिवसेना देखील रस्त्यावरची संघटना आहे, असं वैभव नाईक म्हणाले.