राज्यातील बहुचर्चित आणि यशस्वी लाडक्या बहीण योजना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. दरम्यान , या योजनेचा लाभ काही महिलांना मिळाला असून काही बहिणी अजूनही या योजनेपासून वंचित आहेत . हया योजनेचा लाभ सर्व बहिणींना घेता यावा म्हणून राज्यसरकार सर्वोतपरी पर्यत्न करत आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळत असतानाच संभाजीनगर जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले आहेत. या अर्जाची पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या 12 भावांनी महिलेचं छायाचित्र लावून स्वत:चा अर्ज भरल्याचं समोर आलं आहे. कन्नडच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्या 12 जणांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या 12 जणांवर गुन्हे दाखल करायचे का नाही? हे अहवालाच्या उत्तरानंतर ठरवणार असल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे, त्याची तपासणी सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की , 12 भावांनी स्वत:च्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वत:च्याच नावाचं अपलोड केलं, तसंच हमीपत्रही स्वत:च्याच नावाने भरून दिलं. पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले, यामध्ये या पुरुषांनी काही ठिकाणी तर स्वत:चेच फोटो वापरले आहेत. लाडक्या बहिणींप्रमाणे आपले अर्जही त्वरित मंजूर होतील, म्हणून पुरुषांनी हे अर्ज केले.