राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. ही योजना कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत आहे. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप
झाले . परंतु या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत . दरम्यान, अकोला जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला शहरातील सहा युवकांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 6 पुरुषांनी अर्ज भरल्याचे तपासात आढळून आले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की , हे सहा युवक हे अकोला महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असून या युवकांनी स्वतःचे आधार कार्ड नारीशक्ती दूत ॲपवर अपलोड करून संपूर्ण माहिती खोट्या स्वरूपाची भरल्याचे दिसून आलेय. महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका यांच्या तपासणी दरम्यान सदरचा हा प्रकार उघडकीस आला.
या सहा पुरुषांना आधार कार्ड द्वारे कोणतेही लाभ मिळणार नसल्याचं संबंधित विभागाने म्हंटलय. तसेच या युवकांकडून संबंधित प्रकाराबद्दल खुलासा मागवण्यात आला आहे. महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसतकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.