राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे . असं असलं तरीही राजकीय वर्तुळात विरोधकांकडून या योजनेवरून अनेक मुद्द्यांवर टीका करण्यात येत आहे. परंतु आता भाजप पक्षाच्या च एका नेत्याने या योजनेवरून एक वक्तव्य केले आहे , त्यावरून विरोधकांनी या नेत्यास घेरले असून सडकून टीका करण्यात येत आहे .
लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे असे वक्तव्य कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले. त्यांच्या याच भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. दुसरीकडे विरोधी पक्ष नेते विजय पाटील यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत भाजपचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका केली. यावर आमदार टेकचंद सावरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
महिलांना आर्थिक संपन्न करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांना देखील एकत्र आणलं आहे. शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जुगाड केला आहे. मतदानसाठी ही योजना आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मी हिंदीत भाषण देत होतो. त्यामुळे माझ्या भाषणाचा विपर्यास केला जात आहे, अशी सारवासारव आमदार टेकचंद सावरकर यांनी विरोधकांच्या टीकेनंतर केली.
काँग्रेस नेते सुनील केदार यांनी ही योजना बंद करण्याचे वक्तव्य केले आहे. तसेच काँग्रेसच्या संबंधित काही लोक ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात देखील गेले आहेत. काँग्रेस जवळ काहीच नाही म्हणून एडिट करून व्हिडीओ व्हायरल करताहेत. मी अनेक मेळाव्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार केला आहे.
दरम्यान , विरोधकांच्या टीकेचा राज्य सरकारवर कुठलाही परिणाम होत नाही. व्हिडीओ व्हायरल करणे हे विरोधकांचे कामच आहे. ही योजना जुमला आहे असं विरोधक म्हणायचे. सरकारी योजना लोकांना लाभ देण्यासाठी असतात. राज्यातील जनता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर प्रचंड खुश आहे. त्यामुळे याचा येणाऱ्या काळात फायदा होऊ शकतो, असेही आमदार टेकचंद सावरकर म्हणाले.