घर बसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखवून साडेसात लाखांची फसवणूक
घर बसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखवून साडेसात लाखांची फसवणूक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- घरी बसून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात मोबाईलधारकाने एका तरुणास साडेसात लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांंनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मच्छिंद्र ज्ञानेश्वर संधान (वय 36, रा. श्रीजी श्रीरंग अपार्टमेंट, इंदिरानगर, नाशिक) हे ऑनलाईन पोर्टलवर घरबसल्या कामाच्या शोधात होते. त्यादरम्यान, 9982071600 या व्हॉट्सॲप क्रमांकधारक अज्ञात इसमाने संधान यांच्याशी संपर्क साधला. घरी बसून तुम्हाला भरपूर पैसे कमावता येतील, असे आमिष दाखविले. त्यानंतर संशयित इसमाने संधान यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यावर फिर्यादी यांचा विश्वास बसला. त्यानंतर अज्ञात इसमाने संधान यांना एयू स्मॉल फायनान्स बँक, येस बँक व पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यांवर, तसेच यूपीआय व टेलिग्राम चॅनलवरून घरबसल्या काम मिळविण्यासाठी काही रक्कम जमा करण्यास सांगितले. 

त्यानुसार फिर्यादी संधान यांनी दि. 19 ते 21 ऑगस्ट यादरम्यान संशयित आरोपीने सांगितलेल्या विविध बँकांच्या खात्यांवर यूपीआय व टेलिग्राम आयडीद्वारे 7 लाख 47 हजार 719 रुपये वेळोवेळी जमा केले; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमेची गुंतवणूक करूनही घरबसल्या काम मिळाले नाही. त्यानंतर फिर्यादी संधान यांनी संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर मच्छिंद्र संधान यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group