नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पफ्स ॲण्ड रोल्स नावाच्या बेकरी पदार्थ विक्रीच्या दुकानातील कर्मचाऱ्याने व्यवसायापोटी आलेले साडेतीन लाखांची रोकड बँकेत न भरता परस्पर चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शाहरुख होशी पटेल (रा. गायकवाडनगर, केतकर हॉस्पिटलसमोर, नाशिक) यांची सातपूर एमआयडीसीत सौरा बिल्डिंगमध्ये पफ्स ॲण्ड रोल्स या नावाची बेकरी पदार्थ विक्रीची कंपनी आहे, तर आरोपी जयेश राजेंद्र महाजन (रा. नांदूर नाका, नाशिक) हा तेथे कामाला होता. तो दि. 31 डिसेंबर 2024 या कालावधीत बेकरी पदार्थ विक्रीच्या माध्यमातून मिळणारे पैसे पफ्स ॲण्ड रोल्स नावाने एचडीएफसी बँकेच्या खात्यात जमा करीत असे; मात्र डिसेंबरमध्ये त्याने बँकेच्या खात्यात 3 लाख 60 हजार 610 रुपये भरले नसल्याचे आढळून आले.
तसेच या रकमेची बिले फाईलसह नसल्याचे फिर्यादी पटेल यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरोपी महाजन यांच्याकडे याबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फिर्यादी पटेल यांची खात्री झाली, की आरोपी महाजन यानेच ही रक्कम चोरून नेली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जयेश महाजन याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक न्हाळदे करीत आहेत.