आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज एकवटलाय. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी आणि मराठा समाज आमनेसामने येतो की अशी स्थिती निर्माण झाली आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील थेट एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत.
छगन भुजबळ तर उघड विरोधी भूमिका घेत असल्याने सरकारमधील नेते त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. राज्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील वाचाळविरांना तंबी दिली आहे. मात्र अजित पवारांचा रोख छगन भुजबळ यांच्याकडे होता का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अजित पवार यांनी म्हटलं की, सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार संविधानाने दिला आहे. पण त्याचा वापर कुणी कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखाद्या समाजाची भूमिका मांडताना कटुता वाढू देऊ नका, असा सल्ला त्यांनी सर्वच नेत्यांना दिला आहे.
राज्यात रोज वेगवेगळे प्रश्न असताना रोज कुणी येतं आणि काहीतरी विधान करतंय. कुणी आरे म्हटलं की दुसऱ्याने कारे म्हणायचं ही महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनीही कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं.
छगन भुजबळांचं नाव घेऊन याबाबत विचारणा केली असता अजित पवार यांनी म्हटलं की, मला कुणा एकाला नाव घेऊन बोलायचं नाही. मी कुठल्याही पक्षाचा, नेत्याचा उल्लेख केलेला नाही. मात्र माझ्यासह सर्वांनी आत्मचिंतन करायला हवं.