पालघर हादरलं! वाड्यात अनधिकृत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, ४ गंभीर जखमी
पालघर हादरलं! वाड्यात अनधिकृत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, ४ गंभीर जखमी
img
दैनिक भ्रमर




जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके (Fireworks) बनवणाऱ्या कारखान्यात आज भीषण स्फोट (Blast) झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (वय 25) या कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

जखमींमध्ये मोनिका पडवळे, मोनिका जाधव, अर्चना मिसाळ आणि जयश्री रावते यांचा समावेश असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संबंधित कारखान्यात (Palghar) एकूण सुमारे 32 कामगार काम करत असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, कोणसई परिसरात हा कारखाना अनधिकृतपणे सुरू होता. या कारखान्यात सुतळी बॉम्ब, त्याचप्रमाणे इतर फटाक्याचं उत्पादन होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

सण-उत्सव आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन वाडा तालुक्यात अशा बेकायदेशीर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः सुतळी बॉम्ब आणि इतर धोकादायक फटाके बनवण्याचे काम कोणतीही सुरक्षा उपाययोजना किंवा परवानगी न घेता सुरू असल्यामुळे कामगारांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रशासन आणि पोलिसांच्या कथित दुर्लक्षामुळे किंवा मूकसंमतीमुळे असे कारखाने बिनधास्तपणे सुरू आहेत.

यापूर्वीही अशा घटनांची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनेनंतर स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास काही अडचणी निर्माण झाल्याचे समजते.

या घटनेमुळे संपूर्ण वाडा तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाडा तालुक्यात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत फटाके कारखान्यांवर तातडीने कारवाई करून त्यांना बंद करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले असून पुढील तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group