राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत आहेत. मात्र खडसे यांनी या चर्चा फेटाळून लावत माझा सध्या तरी असा कोणताही विचार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु आता एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून त्यांनी स्वत:च आपण भाजपमध्ये जात असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान खडसे यांचा भाजप प्रवेश कधी होणार, विशेष म्हणजे आज सायंकाळपर्यंत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपमधून पक्षांतर करून राष्ट्रवादीत आलेले खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याने हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ खडसे यांचं महाराष्ट्र भाजपमध्ये मोठं वर्चस्व होतं. मात्र राज्यातील भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या हाती गेल्यानंतर खडसे यांची पक्षातील ताकद कमी होत गेली आणि मतभेद विकोपाला गेल्याने अखेर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पवारांनी खडसे यांचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना विधानपरिषद आमदार म्हणून संधी दिली होती. मात्र मागील काही महिन्यांपासून खडसे कुटुंबाभोवती केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा फास घट्ट होत चालला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
एकनाथ खडसे यांनी नुकतीच दिल्लीवारी करत केंद्रीय स्तरावरील भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता त्यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला असून मी भाजपमध्ये जात असल्याचा खुलासा स्वत: खडसे यांनी केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची ही अतिशय महत्वाची घडामोड मनाली जात आहे.