जुने नाशिक मध्ये भीषण आगीत 50 वाहने जळून खाक,  दोन भंगार गोडावूनसह तीन घरेही जळाली
जुने नाशिक मध्ये भीषण आगीत 50 वाहने जळून खाक, दोन भंगार गोडावूनसह तीन घरेही जळाली
img
Mukund Baviskar
नाशिक (मुकूंद बाविस्कर) :- जुने नाशिक मधील चौक मंडईतील नुरी चौक परिसरात दोन भंगार गोदामांसह एक वाहन बाजारातील 50 वाहनांना तसेच तीन घरांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांतील अग्निशामक दलाच्या 9 बंबांनी प्रत्येकी 3 फेऱ्या करीत 27 फेऱ्यांमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवले. 

जुने नाशिक भागातील उमर शेख यांच्या मालकीचे महाराष्ट्र वाहन बाजारला आज सकाळी 7 च्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. रात्रीच्या सुमारास वाहन बाजारामधील  चार्जिंग असलेल्या वाहनांना बॅटरी चार्जिंग करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी चार बटरींपैकी 2 बॅटऱ्यांचा गरम होऊन सकाळी अचानक स्फोट झाला.  त्यामुळे वाहन बाजारामध्ये ही आग पसरली आणि बघता बघता पेट्रोल असलेल्या गाड्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. ही घटना कळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला भ्रमणध्वनी वरून कळविले.

तसेच चौक मंडई परिसरातील नागरिकांनी देखील मदत आणि बचाव कार्य सुरू केले होते, मात्र ही आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते.
सुमारे दोन-अडीच तास आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. पाठीमागे असलेल्या तीन घरांचे देखील मोठे नुकसान झाले. वाहन बाजारला आग लागली त्यानंतर शोएब शेख यांच्या आश्रफी स्पेअर पार्ट दुकानाला आग लागली. तसेच एजाज शेख, खैरुणीसा हनिफ सैय्यद यांच्या दोन्ही घरांना आग लागली. जहीर शेख यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. नुरी चौक, या भागातील झुल्फिकार शेख यांनी अग्निशमन दलाला कळविले होते.

शिंगाडा तलाव मुख्यालय- 3 बंब आणि नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर, विभागीय केंद्र प्रत्येकी 1 बंबाच्या 3 फेऱ्या झाल्या. शिंगाडा तलावाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, केंद्र प्रमुख दत्तात्रय गाडे, लिडिंग फायरमन किशोर पाटील, संतोष आगलावे, राजेंद्र मोरे, अनिल गांगुर्डे, घनश्याम इंफळ, प्रदीप बोरसे, प्रदीप परदेशी, इसहाक काझी, नाझीम देशमुख, गणेश गायधनी, शरद देटके, राजेंद्र खर्जुल, बाळू पवार यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group