मुंबई : राज्याचे माजी पोलीस महासंचालक व माजी पोलीस आयुक्त संजय पांडे उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपूर्वी माझी भेट घेऊन लोकसभेसाठी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याला मी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पांडे यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले.
केवळ पक्षाच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे. त्याला पर्याय देण्यासाठी, स्थानिक उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरणार आहे. माझ्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून पर्याय पडताळून पाहत होतो, असे पांडे यांनी सांगितले.
उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्ज्वल निकम व काँग्रेसकडून वर्षा गायकवाड निवडणूक लढवत आहेत. त्यात आता संजय पांडेही अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिल्यास चुरस वाढणार आहे. यातील निकम आणि पांडे या दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी नाही.
कोण आहे संजय पांडे
पांडे हे १९८६ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूर येथून माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. पुण्यात साहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ सुरू झाला. मुंबईत १९९२-९३ मध्ये जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. त्यावेळी त्यांनी मोहल्ला कमिटीचा प्रयोग यशस्वीपणे राबवला. हॉवर्ड विद्यापीठातून १९९८ मध्ये मास्टर्स केल्यानंतर ते काही काळ तत्कालीन पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकात होते. त्यांनी २००१ मध्ये राजीनामा दिला, पण तो स्वीकारण्यात आला नाही. न्यायालयीन लढाईनंतर २०११ मध्ये ते पुन्हा पोलीस दलात परतले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.