नाशिकमध्ये महायुतीला दिलासा!
नाशिकमध्ये महायुतीला दिलासा!
img
Dipali Ghadwaje
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. महायुतीमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजप नेते अनिल जाधव उमेदवारी अर्ज माघार घेणार का? याकडे नेत्यांचे लक्ष लागले होते. अखेर अर्ज माघार घेण्यासाठी अवघा एक मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव धावत पळत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले अन् हेमंत गोडसेंनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

यावेळी महायुतीच्या नेते, पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

मात्र भाजप नेते अनिल जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनिल जाधव यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

अनिल जाधव हे अर्ज माघार घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अनिल जाधव अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले नसल्याने हेमंत गोडसे यांना ताटकळत उभे राहावे लागले. अखेर माघार घेण्यासाठी अवघा १ मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव पोहोचले.

त्यानंतर हेमंत गोडसे, अनिल जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अक्षरशः धावत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जावे लागले. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते, बंडखोर अनिल जाधव अन् उमेदवार हेमंत गोडसे यांची चांगलीच दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group