T20 World Cup 2024 स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.भारत झिम्बाब्वे विरुद्ध सीरीज खेळणार असून या सीरीजसाठी निवड समिती एका युवा खेळाडूला कॅप्टन बनवणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिलवर बीसीसीआय नवी जबाबदारी देऊ शकते. गिलला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाचा नवा कर्णधार बनवले जाऊ शकते.
दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या महत्त्वाच्या खेळाडूंना संघात स्थान दिले जाणार नाही. यामध्ये विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे.
वरिष्ठ निवड समितीने हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनाही या दौऱ्यात सहभागी होण्यास सांगितले, पण दोघांनीही त्यासाठी नकार दिला. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचाही संघात समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तुषार देशपांडे आणि हर्षित राणा यांचाही समावेश होऊ शकतो. संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग यांचीही या दौऱ्यासाठी निवड केली जाऊ शकते.
वरिष्ठ निवड समितीने आगामी मालिकेसाठी आधीच २० सदस्यीय संघ निवडला आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून अंतिम उत्तराची प्रतीक्षा आहे. गिल राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गेला होता. पण नंतर तो आवेश खानसोबत भारतात परतला. अभिषेक शर्माचा टीम इंडियामध्ये समावेश होण्याची ही पहिलीच वेळ असेल . पंजाबच्या फलंदाजाने आयपीएलमध्ये हैदराबादसाठी ४८४ धावा केल्या. याशिवाय राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने एकूण ५७३ धावा केल्या होत्या.