गेल्या काही महिन्यांपासून भारताचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर आज न्यायालयाने निकाल दिला आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा दोघांच्या संमतीने घटस्फोट झाल्याचे वकिलांनी सांगितले.
चहल आणि धनश्री दोघांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आज कौटुंबिक न्यायालयाने दोघांचे घटस्फोटाचे अपील मंजूर केले आहे. ४ वर्ष आणि ३ महिन्यांनंतर दोघेही विभक्त झाले आहेत.
या सुनावणीसाठी चहल आणि धनश्री पोहोचले होते. चहल प्रथम काळे जॅकेट आणि मास्क घालून त्याच्या वकिलांसह पोहोचला. काही वेळाने धनश्री पांढरा टी-शर्ट घालून पोहोचली. या दोघांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
युझवेंद्र चहलचे वकिल नितीन गुप्ता म्हणाले, “दोघांचेही लग्न संपुष्टात आले आहे. दोन्ही पक्षांचा आता अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे आणि आता ते दोघेही पती-पत्नी नाहीत. त्यांची संयुक्त याचिका स्वीकारण्यात आली आहे.”
तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दरम्यान त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले, तर एकमेकांचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावरून डिलीट केले होते. अफवा सुरू असतानाच गेल्या महिन्यातच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्याचे समोर आले आणि आज अखेरीस त्यांच्या घटस्फोटावर निर्णय झाला.