महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे नव्या २०२४ -२५ हंगामासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व साहिल पारख यांची महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरातून महाराष्ट्र संघाच्या कर्नाटक व पुदुचेरी दौऱ्यासाठी निवड झाली आहे.
सत्यजित बच्छाव व मुर्तुझा ट्रंकवाला निखिल नाईकच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ए संघातर्फे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेकरीता सराव दौऱ्यावर जात असून, साहिल पारख हर्शल काटेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र बी संघातर्फे पुदुचेरी सराव दौऱ्यावर जात आहे.
डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव व सलामीचा फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला हे अनुभवी रणजीपटू आहेत. तर १९ वर्षांखालील उदयोन्मुख युवा खेळाडू डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची पहिल्यांदाच रणजी शिबिरासाठी निवड झाली. सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.
सत्यजित बच्छाव यंदाच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बळी घेत उत्कृष्ठ गोलंदाज सन्मान पर्पल कॅप चा मानकरी ठरला. सत्यजितने एकूण २५ बळी घेत वसंत रांजणे पर्पल कॅप चा बहुमान मिळवला होता. सत्यजित बच्छावला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे २०२२ वर्षा साठीचे सर्वोत्कृष्ट - बेस्ट - क्रिकेटपटू चे पारितोषिक मिळाले आहे .
२०१८-१९ या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत सत्यजित बच्छावने सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे.
मुर्तुझा ट्रंकवाला, नाशिकचा सलामीचा फलंदाज याचे महाराष्ट्र संघातर्फे भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत २०२३-२४ च्या हंगामात दमदार पुनरागमन झाले. संधी मिळताच विदर्भ संघा विरुद्ध दुसऱ्या डावात मुर्तुझा ट्रंकवालाने १२६ चेंडूत १५ चौकारांसह ८६ धावा केल्या. २०१७ सालीच मुर्तुझाचा महाराष्ट्र रणजी संघामध्ये पहिल्यांदा समावेश झाला होता. त्यावेळी पहिल्याच रणजी सामन्यामध्ये मुर्तुझाने शतक झळकावले होते व पदार्पणातच शतक झळकवणारा नाशिकचा पहिला खेळाडू ठरला होता. मुर्तुझा २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचाहि कर्णधार होता.
साहिल पारख याची १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळतर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमीच्या हाय परफॉरमन्स कॅम्प - उच्च कामगिरी साठीचे शिबिरासाठी निवड झाली होती. माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी झालेल्या शिबीरात साहिलची सलग दुसऱ्या वर्षी निवड झाली होती.
त्यानंतर आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील बीसीसीआयच्या इंटर एन सी ए स्पर्धेत इंडिया बी कडून खेळताना एकदिवसीय सामन्यात साहिलने अतिशय आक्रमक व सातत्यपूर्ण धडाकेबाज फलंदाजी केली व ४ डावात १६८ च्या सर्वाधिक स्ट्राइक रेट नी ९१.६७ च्या सरासरीने एकूण २७५ धावा कुटल्या. साहिलची १९ वर्षांखालील एक दिवसीय चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया डी संघात निवड झाली होती .
सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला व साहिल पारख यांच्या या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिघांचेही अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.