पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मध्ये ४७ वर्षांनी विद्यार्थ्यांची शाळा भरते तेव्हा.....
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मध्ये ४७ वर्षांनी विद्यार्थ्यांची शाळा भरते तेव्हा.....
img
Dipali Ghadwaje
शाळेत असताना सारखं वाटायचं लवकर मोठ्ठं व्हावं.. आपल्या जवळ भरपूर पैसे असावे. पण मोठेपणा बरोबर सावली सारख्या जबाबदा-याही येतात हे तेव्हा कळलं नाही. जबाबदाऱ्या वाढल्या तेव्हा वाटलं बालपणीचा काळ सुखाचा.. पुन्हा शाळेत जावून बसावं..सन १९७७ साली पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल पाचवीत प्रवेश घेतला. सगळंच नवीन होतं शाळा, वातावरण. शाळेतल्या बाई आणि गुरूजी ऐवजी आता सर आणि मॅडम आल्या. सहाध्यायी नवीन. हळूहळू मैत्री झाली ती आजतागायत. दोन चार अपवाद वगळता आणि काहींचं अकाली निधन झाले ते सोडले तर सगळेच संपर्कात..मग काय.. फोन केला सर्वांना. पुन्हा शाळा भरवायची..पुन्हा वर्गात बसायचं  सगळेच तैय्यार..सुरु झाली लगीनघाई.. सगळेच नौकरी व्यवसाय यामध्ये अजूनही गुंतलेले.

त्यामुळे फक्त शनिवार रविवार मिळायचा तयारीला. धनंजय देशपांडे, जयंत होनराव, सुधाकर तितरे, योगेश देशपांडे, गिरीश लगड, सुनील जाजू, सुधीर पवार, महेंद्र कोष्टी ही मंडळी होतीच सोबतीला. कार्यक्रम आखणी करताना वेगवेगळ्या कल्पना सुचल्या..इतर मित्रांनी सूचना केल्या. त्या सर्वांचा समावेश करुन कार्यक्रम निश्चित केला. बाहेरगावी असलेल्या मित्रांशी बोलून तारीख निश्चित केली. सगळ्यांची साईज घेऊन गणवेश टाकले, माजी शिक्षकांना घरी जाऊन निमंत्रण दिले, शाळेची परवानगी घेतली, नाष्टा- जेवण ऑर्डर दिली..सर्वांसाठी स्मृती चिन्ह, फोटो शुटिंग अशी साग्रसंगीत तयारी केले. कार्यक्रमाची मिनिट टू मिनिट पत्रिका तयार केली आणि अखेर तो दिवस उजाडलाच. २२ जून २०२४.  सकाळी १०.०० वाजता मुलं येण्यास सुरुवात झाली. मुंबई पुण्याहून येणारे देवेंद्र दळवी, मंदार,शाम, राघवेंद्र वेळेवर हजर झाले. स्थानिक मित्रही हळूहळू हजर झाले.

एकूण ३२ विद्यार्थी हजर होते. गुरूजनांचे वर्गात आगमन झाले सर्वांनी फुले उधळत आणि एक साथ नमस्ते एक दो म्हणत त्यांचं स्वागत केलं.  दिवंगत गुरुजनांना श्रद्धांजली अर्पण केली. वैद्य मॅडम यांनी हजेरी घेतली. विद्यार्थी मित्रांनी आपापली ओळख करुन दिली. सर्व विद्यार्थ्यांना *माझी शाळा*या विषयावर निबंध लिहायला सांगितला. १२.२० ला प्रार्थनेची घंटा झाली. सर्व मित्र रांगेत मैदानावर आली. सध्याच्या मुलांबरोबर राष्ट्रगीत, प्रार्थना झाली हे दृश्य फार विलोभनीय होतं. 

प्रार्थनेनंतर मुख्य हॉल मध्ये आलो. दीप प्रज्वलन, गुरुजनांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांनीच केला. त्यानंतर संजय गायकवाड, विजय कुलकर्णी मंदार वैद्य यांनी आठवणी जागवल्या. त्यानंतर वैद्य मॅडम, आचार्य सर, गोरे मॅडम   यांनी आशीर्वाद म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. वाढतं वय आणि तब्येत साथ देत नसतानाही साने मॅडम आल्या यांचा फारच आनंद झाला. दळवी मॅडम बाहेरगावी असूनही त्यांनी व्हिडिओ कॉल द्वारे आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी सर्वांना आठवण म्हणून गृप फोटो, स्मृतिचिन्ह देण्यात आले. 

कार्यक्रम संपल्यावर सर्व मित्रांनी शिक्षकांसह सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. हा दिवस संपूच नये असं वाटत होतं. शेवटी इतर जबाबदाऱ्या कमी झाल्याने ठराविक कालावधीनंतर असा स्नेह मेळावा पुन्हा आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आणि एकमेकांचा निरोप घेतला. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनंजय देशपांडे, यतीन मुजूमदार, सुधाकर तितरे, जयंत होनराव, योगेश देशपांडे, गिरीश लगड, संजय गायकवाड, सुनील जाजू, महेंद्र कोष्टी यांनी परिश्रम घेतले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group