राष्ट्रवादीचा उद्या कार्यकर्ता मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद साधणार
राष्ट्रवादीचा उद्या कार्यकर्ता मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संवाद साधणार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज (दि. 23) औरंगाबाद रोडवरील जेजुरकर मळ्यातील जयशंकर फेस्टीवल लॉन्समध्ये सकाळी दहा वाजता जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांनी दिली.

मेळाव्यासाठी प्रमुख म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकार्‍यांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात खा. भास्कर भगरे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले असून पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये जोश आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत असून, त्याकरिता पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

मेळावा झाल्यानंतर जयंत पाटील पंधराही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभेतील पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी क्रमवारी ठरवली असून, नाशिक (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांसमवेत प्रदेशाध्यक्ष पाटील चर्चा करतील. त्यानंतर नाशिक पश्‍चिम, नाशिक मध्य, देवळाली, सिन्नर, दिंडोरी-पेठ, कळवण-सुरगाणा, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर, नांदगाव, येवला, बागलाण, चांदवड-देवळा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व निफाड या मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी चर्चा होणार आहे.

मेळाव्यास नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड आदींसह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहरातील विभागीय अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष , सर्व सेलचे अध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, युवक तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष, कार्याध्यक्ष आदींसह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. त्यात मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.


इतर बातम्या
Join Whatsapp Group