नाशिक (प्रतिनिधी) :- सातपूर येथील एका उद्योजकाने आपल्या कंपनीत केबिनमधील टेबलच्या लॉकरमध्ये लॉक करून ठेवलेली सुमारे 12 लाखांची रक्कम चोरीस गेली होती. याबाबत तक्रार दाखल होताच अवघ्या 18 तासांत गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणून दोघा आरोपींना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, की सातपूर एम. आय. डी. सी. तील नाईस परिसरात कोरल ऑफसेट प्रिंटर्स कंपनीचे संचालक अतुल राणे यांनी त्यांच्या व्यवसायानिमित्त जमा केलेली 11 लाख 95 हजार 800 रुपयांची रक्कम केबिनमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये लॉक करून दि. 22 सप्टेंबर रोजी रात्री सुरक्षित ठेवली होती. दि. 24 रोजी सकाळी ते ऑफिसमध्ये आले असता अज्ञात चोरट्याने ही रक्कम चोरून नेल्याचे आढळले.
त्यामुळे सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. मोठी रक्कम असल्यामुळे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी पोलिसांना या घरफोडीचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-2 चे पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, हवालदार राजेंद्र घुमरे, चंद्रकांत गवळी, संजय सानप, प्रशांत वालझाडे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे, पोलीस नाईक खरपडे, अंमलदार सागर गुंजाळ, जितेंद्र वजीरे, जाधव आदींनी घटनास्थळी पुराव्याचा कौशल्याने अभ्यास करून आरोपी चेतन सुनील राणे (वय 28), सागर धनंजय चौधरी (वय 24, दोघेही रा. तिरंगा चौक, कामगारनगर, सातपूर) यांना अटक केली व आरोपींकडून 11 लाख 95 हजार 800 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
अवघ्या 18 तासांत गुन्ह्याची उकल केल्याबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातपूर पोलीस, तसेच गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाचे अभिनंदन केले आहे. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.?