३६ प्रवाशांना विमानतळावर सोडून नाशिकच्या ट्रॅव्हल चालकाचे पलायन; वाचा नेमके काय घडले
३६ प्रवाशांना विमानतळावर सोडून नाशिकच्या ट्रॅव्हल चालकाचे पलायन; वाचा नेमके काय घडले
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- नाशिक ते कुलू-मनाली, कुलू-मनाली ते नाशिक पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकच्या ३६ पर्यटकांना विमानतळावर सोडून त्यांची फसवणूक करून पलायन केलेल्या ट्रॅव्हल्सचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शुभांगी हेमंत बडगुजर (वय ३५, रा. शकुंतला हाईट्स, कामटवाडा, सिडको) या खासगी क्लासेस चालवून उदरनिर्वाह करतात. बडगुजर यांना नातेवाईक व मित्रमैत्रिणींसह कुलू-मनाली येथे फिरण्यासाठी जायचे होते.

त्यावेळी त्यांची तोंडओळख असलेल्या वकील मनीषा मेहता यांच्याकडे हा विषय काढला असता त्यांनी त्यांच्या भावाच्या ओळखीचा आरोपी राजीव मदनलाल चंदा (वय ३५, ओम्कार हाईट्स, इंदिरानगर, नाशिक) याचा संदर्भ दिला. राजीव चंदा याची विकी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स नावाची कंपनी आहे. फिर्यादी बडगुजर यांनी दि. १२ जानेवारी २०२४ रोजी राजीव चंदा यांना फोन करून फिर्यादीच्या वडिलांच्या घरी तिडकेनगर येथे बोलावून घेतले. तेथे आल्यानंतर चंदा याच्याशी नाशिक ते कुलू-मनाली व कुलू-मनाली ते नाशिक असा प्रवास करायचा असून, त्यासाठीचे नियोजन केले. त्यावेळी राजीव चंदा याने ३६ जणांचे मिळून ५ लाख ३३ हजार रुपये लागतील, असे सांगितले. त्यास फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी होकार दर्शविला.

त्यानंतर टूरला जाण्यासाठी अ‍ॅडव्हान्स म्हणून राजीव चंदा याला त्याच्या विकी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यात ५० हजार रुपये ऑनलाईन दिले. काही दिवसांनी चंदा याने फिर्यादी बडगुजर यांना फोन करून सांगितले, की रेल्वे व विमानाचे तिकीट काढण्यासाठी अ‍ॅडव्हान्स म्हणून काही रक्कम पाठवा. त्यानुसार त्यांनी ८० हजार रुपये बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर पाठविले.

 त्यानंतर दि. १८ जानेवारी २०२४ रोजी रोख स्वरूपात ३० हजार रुपये दिले. त्यानंतर २० जानेवारी रोजी हॉटेल बुकिंगसाठी पैसे लागतील म्हणून चंदा याने सांगितले.

त्यानुसार त्याच्या बँक खात्यात ५८ हजार रुपये जमा केले. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२४ रोजी आरोपी चंदा याने फिर्यादी यांना पुन्हा फोन करून कुलू-मनाली येथे फिरण्यासाठी गाड्या बुक करायच्या असल्यामुळे पैसे पाठवा, असे सांगितले; मात्र त्यावेळी सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. तू माझ्या वडिलांच्या घरी ये. त्यानुसार आरोपी चंदा हा त्यांच्या वडिलांच्या घरी आला. त्यावेळी त्याला ५० हजार रुपये रोख स्वरूपात दिले.

त्यानंतर दि. ७ फेब्रुवारी रोजी ५० हजार रुपये खात्यात जमा केले. दोन दिवसांनंतर सकाळी आरोपी चंदा याचा पुन्हा फोन आला. आज रात्री आपल्याला ट्रेनच्या बुकिंगनुसार निघायचे आहे. त्यासाठी आणखी थोडे पैसे द्या, असे सांगितल्यावर फिर्यादी बडगुजर यांनी लगेच ५० हजार रुपये ऑनलाईन व ६० हजार रुपये रोख स्वरूपात वडिलांच्या घरी बोलावून दिले. दि. १० फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजता दादर-अमृतसर ट्रेनने प्रवास केला. दुपारी २ वाजता अंबाला स्टेशनवर उतरले. त्यानंतर मनाली येथे पोहोचले असता आरोपी चंदा याने पुन्हा १९ हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. 

त्यानंतर ठरलेल्या रकमेप्रमाणे उरलेल्या रकमेची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी बडगुजर यांनी ६० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने दिले. अशा प्रकारे आरोपी चंदा याने वेळोवेळी मागितल्याप्रमाणे त्याला ऑनलाईन व रोख स्वरूपात पैसे दिले; मात्र अनेक ठिकाणी अडवणूक करून त्याने वेळोवेळी या ट्रीपच्या नावाखाली ५ लाख ३३ हजार रुपये घेऊन चंदिगड विमानतळ येथे कोणासही काही एक न सांगता तेथून पर्यटकांना वार्‍यावर सोडून तो पसार झाला.

त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता त्याने तो स्वीकारला नाही, तसेच मनाली येथील हॉटेलचे बिल, मनाली ते चंदिगड गाडीच्या प्रवासाचे भाडे, चंदिगड ते मुंबई असे ३६ पर्यटकांच्या तिकिटाचे पैसे, मुंबई ते नाशिक खासगी वाहनाचे पैसे असे एकूण ३ लाख ६५ हजार रुपये परतीच्या प्रवासाचे खर्च झाल्यामुळे आरोपी राजीव मदनलाल चंदा (वय ४०) याने पर्यटकांची फसवणूक केली, म्हणून त्याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक संगम करीत आहेत.

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group