ठाणे : भिवंडी येथील सहा वर्षीय मुलाची क्षुल्लक कारणावरून गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटघटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , सुधीर पवार असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणात पोलिसांनी अमोल चव्हाण (२२) याला अटक केली आहे. अमोल याने तरुणीची छेड काढून तिला मारहाण केली होती. हा प्रकार सुधीर याने पाहिला होता. त्यामुळे त्याने हत्या केल्याची कबूली दिली. विशेष म्हणजे, अमोल हा सुधीर याचा नातेवाईक असून त्यांच्या घरातच तो वास्तव्यास होता.
भिवंडी येथील हायवे दिवे परिसरात सुधीर हा त्याच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होता. त्यांच्या घरात अमोल चव्हाण राहत होता. रविवारी सुधीर हा बेशुद्ध अवस्थेत इमारतीच्या गच्चीवर आढळून आला. त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
कशी घडली घटना ?
शवविच्छेदन करत असताना सुधीर याच्या गळ्याभोवती डॉक्टरांना व्रण आढळून आले होते. परंतु लहान मुलाला कोण मारेल असा विचार करत सुधीर याच्या वडिलांनी डॉक्टरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. पोलीस ठाण्यात याप्रकरणाची कागदपत्रे गेल्यानंतर पोलिसांनी सुधीरच्या वडिलांना संपर्क साधून त्यांना मुलाची हत्या झाल्याबाबत सांगितले.
दरम्यान, अमोल हा देखील भिवंडीतून निघून गेला होता. तसेच त्याने मोबाईल देखील बंद केला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून नारपोली पोलिसांनी तपास पथके स्थापन केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, अमोल हा छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी अमोल याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. अमोलने त्याच्या इमारतीच्या गच्चीवर तरुणीची छेड काढून तिला मारहाण केली होती. हा प्रकार सुधीर याने पाहिला होता. याबाबत आईला सांगेल असे सुधीर याने अमोलला सांगितले होते. त्यामुळे घाबरलेल्या अमोलने त्याला गच्चीवर नेले. तेथे त्याची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.