हरियाणाच्या गुरुग्राम शहरातील एका उच्चशिक्षित कुटुंबात एका धक्कादायक घटनेने सगळ्यांना हादरवून टाकले आहे. टेनिसपटू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर राधिका यादव (वय 25) हिची तिच्याच वडिलांनी गोळी झाडून हत्या केली. ही घटना गुरुवारी (10जुलै) घडली असून, दीपक यादव या वडिलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राधिका यादवच्या हत्येप्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहे. राधिका यादवच्या हत्येप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी शुक्रवारी (11 जुलै) मोठा खुलासा केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी वडील दीपक यादव यांनी त्यांच्या मुलीच्या हत्येची पूर्णपणे योजना आखली होती. हे रागाच्या भरात अचानक उचललेले पाऊल नव्हते. पोलिसांनी या प्रकरणाबद्दल माहिती देताना सांगितले की, गोळीबार होण्यापूर्वी अनेक आठवडे वडील आणि मुलीमध्ये अनेक वाद झाले होते, त्याची आम्ही चौकशी करत आहोत.
गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 51 वर्षीय दीपक यादव यांनी गुरुवारी (10 जुलै) सकाळी 10:30 वाजता त्यांची मुलगी राधिका यादव हिच्या पाठीत चार गोळ्या झाडल्या. राधिका त्यांच्या तीन मजली घराच्या स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना वडील दीपक यादवने मुलीवरती गोळ्या झाडल्या.
पोलिसांच्या माहितीनुसार राधिकाला मारण्यापूर्वी संपूर्ण नियोजन केले होते. दीपक यादव "सहसा सकाळी स्वतः दूध आणायला जायचा, पण गुरुवारी (10 जुलै) त्याने त्याच्या मुलाला पाठवले. यानंतर, जेव्हा तो राधिकासोबत घरात एकटाच होता, तेव्हा ती नाश्ता बनवत असताना त्याने तिच्यावर चार गोळ्या झाडल्या."
दीपक यादवच्या शेजाऱ्याचा दावा
दीपकच्या मूळ गावी वजीराबाद येथील एका जुन्या शेजाऱ्यानेही असा दावा केला की दीपक राधिकाच्या जीवनसाथीच्या निवडीमुळे नाराज होता. राधिकाला तिच्या जातीबाहेर लग्न करायचे होते, परंतु तिच्या वडिलांना तिने तिच्या जातीत लग्न करावे असे वाटत होते. शेजाऱ्याने असेही सांगितले की राधिकाचे वडील दीपक हे खूप जुन्या विचारांचे होते.