शिक्षकानं सांगितलेली सूचना आवडली नाही म्हणून संतापलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देशभर गुुरुपौर्णिमा साजरी होत असतानाच या घटनेने मात्र मोठी खळबळ उडाली आहे. बारावीच्या दोन विद्यार्थ्यांनी चाकूनं भोसकून त्यांच्या मुख्याध्यपकाची हत्या केली. हरियाणातील हिसार येथील एका शाळेत ही घटना घडली. शिक्षकानं सांगितलेली सूचना आवडली नाही म्हणून संतापलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना ठार मारले.
हे आहे हत्येचे कारण ?
हिसार जिल्ह्यातील बास बादशाहपूर गावातील करतार मेमोरियल सीनियर सेकेंडरी स्कूलचे मुख्याध्यापक जगबीर सिंग (वय 50) यांची 10 जुलैला हत्या करण्यात आली. त्यांना सकाळी 10.30 च्या सुमारास चाकूने चाकूने भोसकण्यात आले. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे कॅम्पसमध्ये घबराहट पसरली.
या प्रकरणात स्थानिक हाँसीचे पोलीस अधिक्षक अमित यशवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना केस कापून येण्यास, व्यवस्थित पोशाख करण्यास आणि शाळेचे नियम पाळण्यास सांगितले होते. सिंग यांनी या मुलांना त्यांच्या वागण्यात सुधारणा करण्याची ताकीद दिली होती.
मुख्याध्यापकांच्या या सूचनेमुळे हे विद्यार्थी संतापले होते. त्यांनी एक फोल्डिंग चाकू बाहेर काढला आणि सिंग यांच्यावर अनेकवेळा वार केले. यात ते जागीच कोसळले. त्यानंतर रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे. कॅम्पसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे मुलगे मुख्याध्यापकांना भोसकून पळताना दिसत आहेत.
यशवर्धन यांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन आहेत आणि त्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. पोलिसांनी शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आणि सखोल तपासानंतरच हत्येच्या नेमक्या परिस्थितीचा उलगडा होईल.